मयूर वाचनालय – माकुणसार

संस्थेची माहिती व इतिहास

वाचनालयाचा प्रवास

      आजपासून सुमारे ४७ वर्षांपूर्वी, आणीबाणीच्या काळात गावातील होतकरू आणि जिद्दी तरुण युवकांनी गावात वाचनालय उभारण्याचा संकल्प केला. हा संकल्प केवळ बोलण्यात न राहता त्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी या उद्देशाने युवकांनी कॉलेजला जाण्यासाठी आई-वडिलांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या पाकीटमनीतून तसेच गावकऱ्यांकडून निधी जमा करून सन १९७९ साली मयूर वाचनालयाची स्थापना केली.

     वाचनालयाची स्थापना होऊन आज ४७ वर्षे झाली. ह्या कालावधीमध्ये वाचनालयाने भरपूर प्रगती केली आहे. हेच वाचनालय आज स्वतंत्र वास्तुमध्ये कार्यरत आहे. कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी देणग्या देऊन वाचनालयाची स्वतंत्र वास्तु सन २०१८ साली बांधली. वाचनालयाची ही नवीन वास्तु एका प्रकारे आमच्या माकुणसार गावचे भूषणच आहे. वाचनालयाच्या ह्या प्रगतीमध्ये अनेक ग्रामस्थांनी बहुमोल सहकार्य केले आहे. वाचनालय सुरुवातीला शासन दप्तरी ‘ड’ वर्गात होते ते पुढे ‘क’ व आजमितीस ‘ब’ वर्गात आहे आणि भविष्यात ‘अ’ वर्गात नेण्याचा मानस कायम आहे.

     वाचनालयात अनेक दर्जेदार ग्रंथ आहेत. दरवर्षी वाचनालयाच्या ग्रंथसंपदेत भर पडत असते. आज मितीस वाचनालयात १२००० पुस्तके आहेत. तसेच विवीध प्रकारची २५ नियतकालीके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. वाचनालयात दररोज १२ वृत्तपत्रे येत असून गावातील अनेक नागरीक त्याचा लाभ घेत आहेत. उपकर्ते, आश्रयदाते, आजीव, सर्वसाधारण प्रौढ व सर्वसाधारण बालविभाग मिळून वाचनालयाचे आजमितीस ४६६ सभासद आहेत. वाचनालयाची इमारत सुसज्ज असून ती सर्व सोई-सुविधांनी युक्त आहे. वाचनालयात पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर आहे. स्वतंत्र कॉम्प्युटर व प्रिंटर आहे. वाचनालयात सुसज्ज वॉशरुम आहे. वाचनालयात अनेक थोर पुरुषांचे फोटो लावले आहेत.


    वाचनालयात दरवर्षी विद्यार्थी व वाचकांसाठी निरनिराळ्या स्पर्धा व कार्यक्रम आयोजित केले जातात. दिवाळीच्या सुट्टींमध्ये रंग भरण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा ह्यांचा समावेश असतो. स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. विजयी स्पर्धकांना शालेय उपयोगी वस्तुंची भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. विवीध स्पर्धें व्यतिरिक्त वाचनालयात वर्षभरात मराठी भाषा गौरव दिन, महिला दिन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, वाचन प्रेरणा दिन, बालदरबार व जागतिक पुस्तक दिन असे हे कार्यक्रमही राबवले जातात. कार्यक्रमास गावातील नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद असतो.

     वाचनालयाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. वाचक हेच वाचनालय जिवंत असल्याचा पुरावा असतो हे ओळखून दर वर्षी इयत्ता ५ वी ते इयत्ता ९ वी पर्यंतच्या माकुणसार गावातील इच्छुक विद्यार्थ्यांना विनाशुल्क बालवाचक म्हणुन सभासद करून घेतले जात असते. विद्यार्थ्यांची अनामत व वार्षिक फी वाचनालयानकडून भरली जात असते. विद्यार्थ्यांस बाल वाड्मय त्यांच्या शाळेत किंवा क्लासमध्ये पोहोचवले जातात जेणेकरून विद्यार्थी गोष्टीरुपी पुस्तके वाचतील व आपल्या मराठी वाचनात व ज्ञानात वाढ करतील तसेच मोबाईल पासुनही दूर राहण्याची सवय लागेल .

     वाचनालय चालविण्याचा खर्च भागविण्यासाठी सरकारी अनुदाना व्यतिरिक्त १०% रक्कम ग्रामस्थांकडून जमवायची असते. सदर रक्कम ग्रामस्थही वाचनालयाप्रती असलेल्या प्रेमापोटी व वाचनालयाचे महत्व जाणून यथाशक्ती देणगी देत असतात.

      मयूर वाचनालय हे आज सरकारमान्य वाचनालय असून गेली ४७ वर्षे आर्थिक संकटांवर मात करत मोठ्या दिमाखात आपली वाटचाल करीत आहे.

वाचनालयाचा प्रवास पुढीलप्रमाणे –

  • १९७९ – ड वर्ग
  • १९९८ – क वर्ग
  • २००८ – ब वर्ग

वाचनालयातील सद्यस्थितीतील सुविधा व उपक्रम –

  • १२ दैनिक वर्तमानपत्रे
  • २६ नियतकालिके
  • १२००० ग्रंथसंपदा उपलब्ध आहे.

      मयूर वाचनालयाची स्वतःची स्वतंत्र वास्तू असून वर्तमानपत्रे वाचनासाठी ग्रामपंचायतमधील स्वतंत्र गाळा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

वाचनालयाद्वारा नियमितपणे पुढील कार्यक्रम आयोजित केले जातात –

  • महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी
  • मराठी भाषा गौरव दिन
  • मराठी भाषा पंधरवडा
  • शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा
  • वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम
  • पुस्तक दिन
  • वाचन प्रेरणा दिन
  • जागतिक महिला दिन
  • पुस्तक प्रदर्शन
  • वाचनसंस्कृती संवर्धन उपक्रम
  • काव्यवाचन उपक्रम
  • कथा अभिवाचन उपक्रम इत्यादी.

      सध्या कार्यरत असलेली विद्यमान समिती वाचनालयाच्या उन्नतीचा वसा घेत वाचनालय अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच वाचनालयाची डिजिटल दिशेने वाटचाल सुरू असून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये पुढील उद्दिष्टे समाविष्ट केली आहेत.

  • प्रवेश शुल्क व देणगी स्वीकारण्यासाठी ऑनलाईन UPI यंत्रणा चालू करणे.✅
  • वाचनालयाचे संकेतस्थळ चालू करणे. ज्यामुळे वाचनालयातील पुस्तकांची माहिती व त्यांची उपलब्धता वाचक ऑनलाईन स्वतःच्या मोबाईलवर तपासून वाचनासाठी आवडीचे पुस्तक सहज निवडेल. त्याचप्रमाणे नवीन पुस्तकांसाठी विनंती करणे व अशा इतर बऱ्याच सुविधांचा लाभ वाचक घेऊ शकतो.✅
  • वाचनालयामध्ये किंडल व टॅबलेट यांच्यावर ईबुक्स, रिसर्च पेपर, ई – साप्ताहिके ही सशुल्क सदस्यता खात्यावरून (Paid Subscription ) उपलब्ध करून देणे.💬
  • वाचनालयाचे ॲप तयार करणे ज्यामुळे वाचकांसाठी पुस्तकांचे वाचन – वापर आणखी नियोजित व सहज होईल.💬

✅(पूर्ण झालेली उद्दिष्टे). 💬(प्रयत्न चालू आहेत.)